कृषि योजना शोधा.....

रविवार, २ एप्रिल, २०२३

शेततळे संपूर्ण नियोजन (प्रश्न-उत्तरे)

शेततळं :


काय आहे शेततळं?

यात आपण पावसाचे पाणी जमा करू शकतो आणि भविष्यात त्याचा वापर करू शकतो.
शेततळ्याचा प्राथमिक उद्देश आहे शेतकऱ्याच्या खरीप पिकांसाठी पाण्याचा सुरक्षित स्त्रोत निर्माण करणे. 
जमिनीच्या भू-गर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी पाणी मुरवण्याची पध्दत म्हणूनही शेततळ्याचा वापर करता येईल.
या सारख्या बांधणीमध्ये साठ लाख लिटर्स इतकं पाणी साठवता येतं.
शेततळ्यामुळे पिकाच्या गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळते, ज्यामुळे चांगले उत्पादनही घेता येतं.

शेततळं कुठे बांधता येईल?

शेततळ्याचे दोन प्रकार आहेत. सामुदायिक शेततळं आणि वैयक्तिक शेततळं
सामुदायिक शेततळं हे साधारणपणे पाणलोटक्षेत्राच्या जवळ निरुपयोगी जमिनीवर किंवा नाल्याजवळील नापिक जमिनीवर खोदता येईल. 
याचा मुख्य उद्देश असेल नाल्यातले पाणी साठवणे अन्यथा जे वाहून जाईल.
साठवलेलं पाणी जमिनीत मुरेल आणि भू-गर्भातल्या पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल.
विहिरी आणि बोअरवेल यांचे पुनर्भरण होईल, ज्यामुळे संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल.
वैयक्तिक शेततळं हे साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेताच्या हद्दीत खोदले/ बांधलं जातं.
हे त्यावेळी बांधले जाते ज्यावेळी सिंचनासाठी शेतकऱ्याकडे विहीर, बोअरवेल किंवा उपसा सिंचनाचा स्त्रोत नसेल.
अश्यावेळी तो जमिनीच्या त्या भागात शेततळं बांधेल जिथे पाण्याचे प्रवाह एकत्र वाहून येतात.
अश्या शेततळ्यामुळे त्याला त्या जमिनीवर पिक घेण्यासाठी पाण्याच्या पुरवठ्याची खात्री मिळते जी पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पडीक राहून जाईल.
शेततळ्यासाठी जागा कशी निवडावी ?
जी जागा नाल्याच्या बाजूला आहे अश्या जागेला प्राथमिकता द्यावी.
जवळपास कुठेही नाला नसल्यास, तुमच्या शेतातून एखादा अगदी छोटा ओहोळ किंवा जलवाहिनी वहात असेल अशी जागा असू शकेल.
अशी जागा निवडण्यात यावी ज्यात ओहोळामधून वाहून येणारे सर्व पाणी सुलभतेने जमा करता येईल.
शेततळं अश्याही जागांवर बांधता येईल जिथे जवळ असलेल्या मोठ्या नाल्यातून किंवा नदीतून पाण्याची उचल करता येईल.
जमीनीची प्रत महत्वाची ठरते का?
निवडलेल्या जमिनीवरची माती सुलभतेने खोदता येत आहे याची खात्री करा.
जर जमिनीवर मुरूम किंवा कठीण खडक असेल तर जास्त खोल शेततळे खोदणे कठीण होईल आणि या शेततळ्याची साठवण क्षमता खूप कमी असेल.
गाळाची माती चिकणमाती किंवा काळी माती ही शेततळं खोदण्यासाठी उत्कृष्ट आहे.

शेततळ्याचे माप कसं / किती /काय असावं?

सरकारने शेततळ्याचे सात वेगवेगळे नमुने मंजूर केले आहेत.
सर्व प्रकारांमध्ये शेततळ्याची खोली ही तीन मीटर्स इतकी निश्चित केली आहे.
शेततळ्याची लांबी आणि रुंदी पुढील प्रमाणे वेगवेगळी असेल. १५ x १५ मीटर्स, १५ x २० मीटर्स, २० x २० मीटर्स, २० x २५ मीटर्स, २५ x २५ मीटर्स, २५ x ३० मीटर्स आणि ३० x ३० मीटर्स.
शेताची गरज आणि सरकारी योजना ज्यातून निधी प्राप्त होणार आहे या अनुसार विशिष्ट आकार निवडला जाईल.

शेततळे कसे बांधावे?

शेततळ्याचे सर्वसामान्य माप ३०x ३०x ३ मीटर्स इतके घेतले जाते.
यासाठी किमान ४४ x ४४ मीटर्स इतक्या आकाराच्या जागेची गरज आहे.
एकात एक असे तीन चौकोन चिन्हांकित करून बांधकामाची सुरुवात होईल.
सर्वात बाहेरच्या चौकोनाचे माप हे अर्थातच ४४ x ४४ मीटर्स इतके म्हणजे जागेच्या आकाराचे आहे.
३० x ३० मीटर्स आकाराचा दुसरा चौकोन आहे, जो तळ्याच्या चार बाजू चिन्हांकित करतो. 
सर्वात आतला चौकोन २४ x २४ मीटर्सचा आहे. जो तळ्याचा तळ चिन्हांकित करतो.
चौकोन कसे आखावेत?
आतले दोन चौकोन काळजीपूर्वक आखायला हवेत ज्यामुळे ते बरोबर कोनात आहेत याची खात्री मिळेल.
यासाठी प्रथम आपण दोरीने एक तळरेषा निश्चित करायची आहे जी तळ्याच्या चार बाजू पैकी एक बाजू निश्चित करेल.
दगडाचा खुणेसाठी वापर करत आपण ही दोरी या रेषेच्या शेवटी काटकोनात वळवू.
दोरीच्या या वळणाचा कोन काळजीपूर्वक सुस्थित करावा जोवर ३ x ४ x ५ मीटर्सचा त्रिकोण साधला जात नाही.
यामुळे चारही कोपरे हे हवे तसे ९० अंशाचे आहेत याची खात्री मिळेल.

 

ही पध्दत वापरून आपण खडूने पहिल्यांदा बाहेरचा ३० x ३० मीटर्सचा चौकोन आणि त्यानंतर आतला २४ x २४ मीटर्स चा चौकोन आखून घेवू.
चौकोन कसे खोदावे?
सर्वात आधी आतला २४ x २४ मीटर्सचा चौकोन खोदून सुरुवात करा.
हा तीन मीटर्स खोलीचा अचूक चौकोनी आकार खोदून घ्यावा.

 

या नंतर मशीन जमिनीच्या पातळीवर आणा आणि काळजीपूर्वक भिंती खरवडून चारही बाजुकडून तळापर्यंत उतार तयार करा. 

खोदून काढलेल्या मातीचे काय करायचे?

खोदून काढलेली माती ही शेततळ्याच्या चारही बाजूना जमा करावी.
तळ्याच्या चारही बाजूच्या आणि बांधाच्या मध्ये कुठेही वाट अथवा रिकामी जागा ठेवू नये.

 

या मातीच्या ढीगाची उंची २ मीटर्स आणि याची तळ बाजू ४ मीटर्स असावी.

 

खोदकाम योग्य पध्दतीने झालेले आहे याची खात्री कशी करता येईल?
तळ्याची लांबी रुंदी आणि खोली यांचे आकारमान योग्य मापात झाले आहे हे तपासण्यासाठी बांधाच्या लांबी आणि रुंदीचे मोजमाप करा.
ते ३४ x ३४ मीटर्स या मापात असायला हवे.
तळ्याच्या बाजू या ३० x ३० मीटर्स आणि तळ्याच्या तळाच्या बाजूचे माप २४ x २४ मीटर्स या मापात असावे.
उतार व्यवस्थित केले गेले आहेत हे तपासण्यासाठी कोणत्याही बाजूचे वर पासून तळापर्यंतचे माप घ्यावे.

 

जर ते माप ७.१० मीटर्स इतके भरले तर याचाच अर्थ उतार हा योग्य रीतीने केला गेला आहे.

शेततळ्यामध्ये पेपरचे आच्छादन करावे का?

एकदा का तळ्याचे खोदकाम पूर्ण झाले, दोन पर्याय शक्य आहेत.
तळ्याचा प्राथमिक उद्देश जर पुनर्भरण असेल तर तळ्याच्या तळाला तसेच काहीही आच्छादन न करता सोडून द्यावे जेणेकरून पाणी जमिनीच्या भू-गर्भात झिरपेल.

 

हल्ली बरेचदा पाणी सुरक्षेच्या हमीसाठी शेतकरी शेततळी बांधतात.
या प्रकारच्या तळ्यांमध्ये पाणी साठून राहावे म्हणून प्लास्टिकच्या कागदाचं आच्छादन करणं गरजेचं आहे.
हा एक विशिष्ट कागद आहे ज्याची जाडी ५०० मायक्रोन इतकी असायला हवी.
हा पुरेसा टिकाऊ आणि मजबूत असायला हवा जेणे करून तो सहजरीत्या फाटणार नाही.
सरकारी मान्यता असलेल्या कंपनीने पुरवलेलाच पेपर वापरावा कारण ते ७ वर्षांची हमी/ गॅरंटी देतात.

पेपरचे आच्छादन कसे करावे?

पेपर जेंव्हा पाणी या तळ्यात शिरतं या कागदावर पाण्याचा दाब येतो.
जमिनीवरल्या अणकुचीदार किंवा दातेरी कडांच्या दगडांनी कागद फाटू शकतो.
म्हणून तळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यावर आपण प्रथम तळ्याचा पृष्ठभाग चिखलाचा चांगला थर देवून आच्छादुन टाकू. 
पेपरचे प्रत्यक्ष आच्छादन हे ती कंपनी करून देईल जी पेपरचा पुरवठा करेल.
तो खाली पकडून ठेवण्यासाठी चर खोदला गेला ज्याच्यात तो ठेवलेला राहील.
तो एका जागेवर भक्कमपणे जमिनीस पकडून स्थिर राहील यासाठी त्याच्यावर माती आणि वजनी दगड ठेवले गेले. ज्यामुळे तो जोराच्या वाऱ्यामुळे किंवा पावसामुळेही जागेवरून हलणार नाही.
जनावरे जसे की कुत्रे किंवा गाईगुरांपासूनही या कागदाला सांभाळाव लागेल. ते तळ्यात शिरून कागद हलवू शकतील किंवा फाडू शकतील.
याकरीता तळ्याच्या चारही बाजूना मजबूत कुंपण उभारावे लागेल जे या जनावरांना तळ्यापासून यशस्वीरीत्या दूर ठेवेल.

पेपर आच्छादनामध्ये शेतकऱ्याची भूमिका काय असेल?

तळ्याच्या तळावर हा पेपर अच्छादून देण्याची जबाबदारी कंपनीची असेल.
याकामी लागणारी मजूरी अंदाजपत्रकात अंतर्भूत असेल.
पेपर हा बरोबर ५०० मायक्रोन जाडीचाच आहे याची खात्री मात्र शेतकऱ्याने करून घेण गरजेचं आहे.
या कागदावर ISI चिन्ह असल्याचं आणि सरकारमान्य कंपनीकडूनच हा पुरवठा झाला असल्याबद्दलही शेतकऱ्याने तपासून घ्यावं.
पेपर सप्लायरला पेपरची पूर्ण रक्कम आधीच देवून टाकू नये.
पेपर पसरवून झाल्यानंतर जर पेपरमधून गळती होत असल्यास कंपनीकडून त्याची दुरुस्ती करवून घेणे हे तुमच्यासाठी अवघड होवून बसेल.
पेपर पसरवून झाल्यावर एका महिन्याच्या आत त्यावर पाणी जमा करणे आवश्यक आहे.
पेपर जर सूर्याच्या उन्हात पाण्याशिवाय जास्त काळ उघडा राहिला तर त्याच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो.
पेपर ऑगस्ट महिन्यात, पावसाचा पहिला टप्पा पार पडल्यावर पसरवणे हे आदर्शवत असेल.
पावसाचा दुसरा टप्पा सुरु होण्याआधी तो पाण्याने भरला जाईल.
वैकल्पिकरित्या, डीजेल किंवा विजेवर चालणारा पंप वापरून पाणी उपसा करून तळ्यात भरू शकतो.
वाफेने पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने होणाऱ्या नुकसानाचे काय?
जास्त कालावधीपर्यंत जेंव्हा तळ्यात पाणी राहिल तेंव्हा बरेच पाणी हे बाष्पीभवनामुळे वाफ होईल.
हे कमी करण्याकरिता अनेक पध्दती वापरता येतील.
काही शेतकरी कोलीन नावाच्या रसायनाचा वापर करतात, पाण्याच्या पृष्ठभागावर हे रसायन तेलासारख पसरवतात.
समस्या अशी आहे की जर एखाद्याने हे रसायन वापरलं तर ते या पाण्यात मस्यशेती करू शकत नाही कारण हे रसायन माश्यांसाठी विषारी असतं. 
पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्याचा दुसरा मार्ग आहे तळ्यात पक्षीपालन करणे.
तरंगत्या पृष्ठभागावर पिंजऱ्यात कोंबडीची पिल्ले ठेवल्यास त्यामुळे पाण्याला सुर्यकिरणांपासून वाचवता येईल. 
यामुळे ५०% इतकं पाणी बाष्पीभवन होण्यापासून वाचवता येईल.
पक्षांची विष्ठा पाण्यात पडेल आणि पाण्यातील मासे ते खातील.
हा एक नाविन्यपूर्वक उपाय होईल.
पक्षी पालन आणि मस्य पालनापासून शेतकऱ्याला चांगली मिळकत तर मिळेलच पण विष्ठामिश्रीत पाण्यामुळे पाणी पोषकतत्वयुक्त होईल आणि पिकांसाठी ते आदर्शवत असेल.

श्रमदानासाठी सरकारच्या काय योजना आहेत?

शेततळ्यासाठी निधीपुरवठा करणाऱ्या तीन सरकारी योजना आहेत.
यातली पहिली योजना आहे ‘मनरेगा’, ज्यात फक्त शेततळे खोदण्याचा खर्च भरून मिळतो.
या योजने अंतर्गत पहिले एक मीटर पर्यंतचे खोदकाम हे हाताने करणे अनिवार्य आहे.
खडकाळ जमीन किंवा कठीण जमिनीमुळे जर हे शक्य झाले नाही तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
दुसरी योजना आहे ‘मागेल त्याला शेततळं योजना’
यात तुम्हाला यंत्राद्वारे काम करण्याची परवानगी आहे आणि रुपये पन्नास हजार इतकी सबसिडी दिली जाते.
शेततळं खोदण्यासाठी प्रत्यक्ष खर्च चाळीस ते पन्नास हजार इतका येतो
म्हणून उरलेली चाळीस ते पन्नास हजारांची रक्कम शेतकऱ्याला स्वतःला खर्च करावी लागेल.
नॅशनल हॉर्टीकल्चर मिशनच्या अंतर्गत ही तिसरी योजना आहे जी शेततळ्यासाठी निधी पुरवते.
या योजने अंतर्गत अर्धे खोदलेले तळे हे मान्यताप्राप्त डिझाईन आहे.
या नमुन्यामध्ये तळे जमिनीत दोन मीटर खोल खोदले जाते आणि खोदलेल्या मातीचा अधिकचा तीन मीटर उंच ढीग लावला जातो.
या योजनेत १००टक्के निधी पुरवठा होतो, यात खोदकाम, पेपरचा खर्च आणि कुंपणखर्च अंतर्भूत आहे.
पण या योजनेची अट अशी आहे की हे शेततळे सामुदायिक तळे असावे.
एकट्या शेतकऱ्याला या योजनेमधून निधी मिळत नाही. कमीत कमी दोन किंवा अधिक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावा.
दुसरी अट अशी की तळ्याच्या पाण्यातून सिंचन केलेल्या जमिनीत शेतकऱ्याने फलोत्पादन, भाज्या किंवा फुलांची रोपांची लागवड करावी.
या दोन्ही अटी पूर्ण झाल्यास पाच लाख छप्पन्न हजार इतकी रक्कम ४४ x ४४ x ५ मीटर इतक्या आकाराचे तळे बांधण्यासाठी मिळते.

शेततळ्यात साठवलेले पाणी कसे वापरले जाऊ शकेल?

शेततळं हे शेतापेक्षा उंच भागात असेल तर पाणी हाताने सायफन पद्धतीने वापरात आणले जाऊ शकते.
जर तुमचे शेततळं हे तुमच्या शेतापेक्षा खालच्या पातळीत असेल तर तुम्हाला विजेवर चालणारा किंवा डीजेल पंप वापरावा लागेल.
लक्षात ठेवा शेततळ्यातील पाणी हे मर्यादित आहे आणि त्याचा वापर संरक्षित सिंचन म्हणून व्हायला हवा.
कमी पाण्याची गरज असणारे फलोत्पादन लागवड, भाज्या आणि फुलशेतीला प्राधान्य दिला गेला पाहिजे.
सिंचन हे ठिबक सिंचन पध्दतीने केले जावे ज्यामुळे पाण्याचा वापर जास्त कार्यक्षमतेने होईल.
दुष्काळावर उपाय म्हणून जास्तीत जास्त शेतकरी हे शेततळे बांधत आहेत.
तुम्ही निधीकरिता सरकारी योजनांचा लाभ घेतल्यास शेततळ्या सारखी रचना कमीत कमी खर्चात बांधून होईल.
जेंव्हा पाउस चुकारपणा करेल तेंव्हा सच्च्या मित्राप्रमाणे शेततळे शेतकऱ्यांच्या मदतीस येईल.
तो या शेततळ्यावर अवलंबून राहू शकतो की त्याचे पिक कधीही वाया जाणार नाही आणि तो त्याच्या शेतातून भरघोस पिक घेवू शकतो

रेशीम शेती

रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी उच्च दर्जाची कोषनिर्मिती करून चांगला दर मिळवू लागले आहेत. मराठवाड्याने यात विशेष आघाडी घेतली आहे. नर्सरीपासून ते तुतीलागवड, चॉकी व रिलींग युनीट या टप्प्यापर्यंतचे तंत्रज्ञान वापरात आले आहे. रेशीम विभागाचे मार्गदर्शन त्यांना लाभते आहे.  मागील पाच वर्षापांसून रेशीम शेती तंत्रज्ञानाबाबतीत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवर मागणी असलेल्या बायव्होल्टाईन या सुधारित रेशीम कीटक वाणाचा वापर राज्यात ९० ते १०० टक्के प्रमाणात होतो. कोष उत्पादनात देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. पारंपरिक व सर्वाधिक रेशीम कोषाचे उत्पादक असणाऱ्या कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकले आहे. यात मराठवाड्याने रेशीम शेतीने चांगली आघाडी घेतली आहे. औरंगाबाद येथील विभागीय रेशीम  कार्यालयाचे त्यांना तंत्रज्ञान मार्गदर्शन मिळत आहे. महा रेशीम अभियान २०१७ पासून  राबविण्यात येत असून असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. असे आहे तंत्रज्ञान  सुधारित जातीचा वापर पूर्वी एम-५,  एस-३६, एस ५४ आदी तुतीच्या जाती उपयोगात आणल्या जायच्या. त्याचीं उत्पादकता २० ते ३० टन प्रति हेक्‍टर होती. आता व्ही-१ जातीचा वापर सुरू केल्याने उत्पादकता हेक्टरी ६० टन ते त्याहून जास्त मिळत आहे. जातीचे फायदे 

पाल्याची प्रत अळयांच्या वाढीसाठी योग्य.
चॉकीसाठीही योग्य जात 
पाला लवकर सुकत नाही.
मुळे फुटण्याचे प्रमाण जास्त.
नर्सरी  पूर्वी कर्नाटक राज्यातून बेणे आणून जून-जुलैमध्ये लागवड व्हायची. त्यामध्ये वाहतुक खर्च एकरी १५ हजार रुपये लागायचा. उगवन क्षमता कमी असायची. आता शेतकऱ्यांनाच नर्सरीचे तंत्रज्ञान सांगण्यात आले आहे. त्यातून जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नर्सरीत लागवड होते. जूनच्या दरम्यान मुख्य शेतात पुनर्लागवड होते.  फायदे 

मुख्य शेतात लागवडीनंतर अडीच महिन्यांत पाला मिळायला सुरुवात. त्यामुळे सप्टेंबरच्या दरम्यान बॅच सुरू करून लवकर उत्पन्न सुरू होते.  
तुतीचा शेतातील पूर्णवाढीचा काळ कमी होऊन नर्सरीत विभागला जातो. 
 कीटक संगोपन गृह 

तीन लाख रुपये गुंतवणूकीत शास्त्रीय पध्दतीचे कीटक संगोपनगृह उभारता येते. त्यात तापमान, ‘स्पेसिंग’, वायुविजन, आर्द्रता, या बाबी नियंत्रित करता येतात.
६० बाय २२ किंवा ५० बाय २२ आकाराचे शेड, खाली कोबा,  तीन फुटाची भिंत घेऊन हिरवी जाळी लावता येते. हंगामानुसार शेडमध्ये याप्रमाणे वातावरण ठेवता येते. 
त्याचे फायदे 

शेडसाठीचा खर्च कमी होतो. 
रॅकवरील फांदी पद्धतीमुळे मजुरी खर्चात बचत 
एका वेळी जास्त अंडीपुंज घेणे शक्य. 
निर्जंतुकीकरण करणे सोपे 
तुती लागवड क्षेत्र वाढविणे शक्‍य  
चॉकी  म्हैसूर येथे तीन महिन्याचे प्रशिक्षण देऊन चॉकीधारक तयार केले जात आहेत. त्यामुळे तापमान, आर्द्रता, वायुविजन, प्रकाश, ‘इनक्‍युबेशन’, ‘ब्लॅक बॉक्‍सिंग’, वाहतूक आदी बाबी काटेकोरपणे पालणे शक्य होत आहे.  फायदे

कोष उत्पादकता वाढण्याच्या अनेक कारणांपैकी चॉकी व्यवस्थापन कारणीभूत.
कोष निर्मितीचा कालावधी १० दिवसांनी कमी झाला. 
रेशीम उत्पादकांना कमी वेळेत योग्य तंत्राच्या आधारे चॉकी अळ्या घरपोच देणे शक्य झाले.  
कोष उत्पादन व धागा   पूर्वी संकरित (क्रॉस ब्रीडर) वाणापासून प्रति १०० अंडीपुंज उत्पादन ४० ते ५० किलो मिळायचे. बायव्होल्टाइन वाणामुळे हेच उत्पादन ६० ते ८० किलो मिळते. तंत्रज्ञानामुळे जागतीक बाजारपेठेत जास्त दर असलेल्या एकहजार मीटरपेक्षा जास्त लांबीच्या धाग्याची निर्मिती शक्‍य होत आहे.  शेतकऱ्यांना त्याचा जास्त परतावा मिळतो. पारंपरिक वाणांपासूनच्या धाग्यांची लांबी ४५० मीटरपर्यंत मिळते.  कोष खरेदी व प्रक्रिया 

सध्या जालना, सोलापूर येथे कोष खरेदी विक्री केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेत
बारामती, पूर्णा, पाचोड,जालना, जयसिंगपूर येथे कोष खरेदी केंद्रे 
त्यामुळे विक्रीसाठी अन्य राज्यात जाण्याची आवश्‍यकता नाही.
उच्च प्रतीच्या रेशीम धागा निर्मितीसाठी जालना,भंडारा व सांगली येथे स्वयंचलित ‘रिलिंग मशिनरी’ चे युनिट. पैठणीसाठी आवश्‍यक चांगल्या प्रतीचे सूत महाराष्ट्रातच तयार होत आहे.
कोषाला प्रति किलो ३०० रूपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास राज्य शासनाकडून प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्याची सुविधा
अर्थकारण एक एकर तुती बागेवर आधारित २०० अंडीपुंजांचे संगोपन करता येते. व्यवस्थापन व कीटक संगोपनात सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यातून १५० ते १६० किलो कोषांचे उत्पादन होते. त्यास किलोला २५० रूपयांपासून ते कमाल ४५० रुपये दर मिळू शकतो. वर्षभरात सुमारे चार बॅचेस होतात. प्रति बॅच २१ ते ३० दिवसांत पूर्ण होते. रेशीम कोष उत्पादनात चीन जगात आघाडीवर आहे.    तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने मराठवाडा रेशीम क्रांतीच्या दिशेन वाटचाल करते आहे. या उद्योगाने शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग दाखवला आहे. - दिलीप हाके 

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

कृषी पर्यटन Agro Tourism

ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर यांच्या संकल्पनेतील ग्रामविकास आणि पारंपरिकता आणि भारतीय कृषी संस्कृती परंपरा.

ग्रामविकास R. Devlopment

कृषी केंद्रित ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सेंद्रीय शेती आणि कृषी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम.

कृषी पूरक व्यवसाय

कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रकारचे उद्योग आणि व्यापार

शासकिय योजना

कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या शासकीय योजना आणि उपक्रम 

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

सेंद्रीय शेती - Organic Farming

 https://youtube.com/channel/UCkMd3QjMDM4dGv48c0wWX0A 

 *सेंद्रिय कर्ब* - *सेंद्रिय शेतीचा आधार* !

सेंद्रिय किवा शाश्वत शेती हि काळाची गरज आहे. पण शेतकऱ्यांशी बोलताना आणि त्यांचे सेंद्रिय शेती बाबतचे अनुभव समजून घेताना , एक गोष्ट प्रखरतेने जाणवते कि, अगदी मोजक्याच शेतकर्यांना सेद्रिय शेती बद्दल शास्त्रशुद्ध माहिती असते. बऱ्याचदा शेतकरी भावनिक दृष्टीकोनातून किवा अपुऱ्या माहितीतून सेंद्रिय शेतीकडे वळतात. शेतीमध्ये भावनिक दृष्टीकोन ठेवण्यात काहीच गैर नाही , पण अपुरी माहिती तोट्याचीच.

बरेच शेतकरी अचानक निर्णय घेतात , उद्यापासून कोणतेही रासायनीक खते वापरायची नाहीत ….जसे कि कोणत्याही तयारी शिवाय कुस्तीच्या आखाड्यात उडी मारणे . मुळात रासायनिक खते खरेच इतकी वाईट आहेत का ? का आपण ती वाईट पद्धतीने वापरतोय ? कोणत्याही गोष्टीचा आतीरेक वाईटच नाही का ? अगदी गरजे पेक्षा जास्त पाणी सुद्धा जमिनीची क्षारता वाढवतेच ना? रासायनीक / अ-रासायनिक खते आणि त्यांचा योग्य वापर हा वेगळा विषय आहे , त्यामुळे तो वेगळाच ठेऊ ! असे पाहू कि अगदी १०० % शुद्ध सेंद्रिय शेती करताना सर्वात महत्त्वाचा घटक ‘सेंद्रिय कर्ब’ (Organic Carbon) म्हणजे काय ? आणि सेंदीय कर्ब इतके महत्वाचे का ?

अगदी सोप्या भाषेत सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील कुजलेला काडी-कचरा (झाडाची पाने / मुळे , प्राणी/ प्राण्यांची विष्ट इ.). एखादी गोष्ट जेव्हा मातीत कुजते तेव्हा त्याचे रुपांतर सेद्रिय कर्ब (Carbon) मध्ये होते. सुक्ष्म जीवूण पासून ते सर्व प्राण्यानपर्यंत सर्वाचे जीवनमान कर्बा वर चालते. जसे पाण्याचे चक्र आहे तसेच कर्ब चे ही चक्रचालूच राहते. सेंद्रिय कार्बामध्ये साधारणता ६५% ह्युमस (Humas) म्हणजे जुन्या सेंद्रिय कर्बा मध्ये रुपांतरीत झालेला भाग असतो , तर तितकेच महत्वाचे म्हणजे १० % पर्यंत जिवंत जीवाणू असतात. असे हि म्हणता येईल कि सेंद्रिय कार्बा मुळेच मातीचा कस वाढून जिवंत पण येतो.

सेद्रिय कर्बचे चे मातितील प्रमाण – अगदी ढोबळमानाने विचार केल्यास मातीमध्ये २५% हवा , २५ % पाणी , ४५ % खनिजे आणि ५% सेद्रिय कर्ब असल्यास अशी माती शेतीसाठी सर्वात चांगली मानता येईल. साधारणता सध्याच्या घडीला माती परीक्षांणानुसार १ % सेद्रिय कर्ब असल्यास अत्यंत जास्त असा शेरा मिळतो. म्हणजेच ५ % सेद्रिय कर्ब ही सध्या जवळपास कोणत्याच शेतकऱ्यांच्या आवाक्यातली गोष्टं दिसत नाही. कसा कुस्ती लढणार सेद्रिय शेतीचा पहेलवान ?

सेद्रिय कर्बचे कार्य – एक महत्वाची बाब म्हणचे , पिके (झाडे) सेद्रिय कर्बचा उपयोग अनद्राव्य म्हणून करतच नाहीत. तर सेद्रिय कर्ब हे मुख्यत्वे मातीतील जिवाणूंचे खाद्य आहे. म्हणजेच जीवाणू सेद्रिय कर्ब खाऊन , मातीतील अनद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात. उदारणार्थ शेण खतातील नत्र अमोनिया (NH3) ह्या स्वरुपात असून Nitrobactor कुळातील बाक्टेरिया त्याचे रुपांतर Nitrate किवा Nitrite (NO३ / NO२) मध्ये करून पिकांना पचनीय स्वरुपात आणून देतात. इतर सर्व अन्नद्रव्यच्या उपलब्धते साठी झाडे जमिनीतील सुक्ष्म-जीवनवरच अवलंबून असतात. सेंद्रिय कर्ब मातीचे भौतिक गुणधर्म जसे कि मातीची पाणी धारण क्षमता, भुसभुशीतपणा इ. सेंद्रिय कर्ब च्या उपलब्धते प्रमाणे बदलते. साधारणता असे मानले जाते कि २ ते ५ % पर्यंत सेंद्रिय कर्ब असणाऱ्या (जंगलातील चहाच्या पुडी सारखी माती ) १ चमचाभर मातीमध्ये पृथ्वीवरील लोकसंख्ये पेक्षा जास्त जीवाणू असू शकतात.

सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे – सध्या आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी (०.१ ते १ %) असण्याचे मुख्य करण – व्यावहारिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर , जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण , पिक पलटणी न करणे , मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे ही दिसतात. नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते. पण व्यवहारिक दृष्टिकोनातून बघताना जमिनीची मशागत न करणे हा पर्याय तरी आता शक्य दिसत नाही.

जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवून सेंद्रिय किंवा शाश्वत शेती कशी करता येईल – जमिनीमध्ये एखादी गोष्ट कुजण्यासाठी ज्या मुख्य गोष्टींची गरज असते त्यामध्ये जमिनीतील ओलावा (पाण्याचे योग्य प्रमाण) आणि नत्राचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीला नत्राचे प्रमाण हे मुख्यता काडी-कचरा (Soil Organic Matter) प्रकार , हवामान इ. वर अवलंबून असते. जसे कि झाडांच्या पानां पेक्षा प्राण्यांपासून तयार झालेला कचऱ्यात ( शेण,गोमुत्र , मासळी खत इ.) जास्त नत्र असते. म्हणूनच उसाच्या पाचटापेक्षा , शेण किवा कोंबड खताला जास्त जोर असतो.

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीतील ओलाव्या नुसार बदलणार असेल तर ह्याचा अर्थ असा की एखाद्या परिसरातील हवामानानुसार मातीमध्ये काडी-कचरा कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये होण्यासाठी कमी-जास्त वेळ लागू शकतो. काडी-कचरा कुजून उपयुक्त सेंद्रिय कर्ब बनण्यासाठी १-५ वर्ष लागू शकतात आणि हा सेद्रिय कर्ब स्थिरावून जमीन पूर्णपणे कसदार होण्यासाठी २० वर्षा

पर्यंत वेळ लागेल. हि वेळ कामी करण्यासाठी काही उपाय आहेत

जसे कि काडी-कचरा जमिनीत कुजण्यास १ महिना लागत असला तरी गाईच्या पोटात तो एका दिवसात कुजतो आणि शेण मिळते ……हे शेण biogas मध्ये वापरल्यास मिळणारी slurry जास्त उपयुक्त होते , ह्या slurry चे गांडूळ खत केल्यास सेंद्रिय कर्ब लवकरात लवकर मिळवता येईल. पण एक दिवसात कोणत्याही तयारी शिवाय सेद्रिय शेती कडे वळणे म्हणजे नुकसान अटळ !

कोकणात जिथे पावसाचे आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे तेथे एखादी गोष्ट कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये लवकर होईल ह्याविरुद्ध विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये मातीतील ओलावा कमी असल्यामुळे एखादी गोष्ट कुजण्यासाठी जास्त वेळ लागेल. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी हवामानानुसार काही गोष्टींचा अभ्यास करून शेतीतील आंतरमशागती किंवा शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा कराव्या लागतील.

हवामानानुसार मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठीचे काही प्रयोग –

जास्त पावसाचा प्रदेश*-

*कोकणासारख्या ठिकाणी खूप पाऊस पडतो आणि जमिनीवर मोठ्या प्रमाणावर झाडाची वाळलेली पाने पडतात तेथे असे आढळून येते की कुजण्याची प्रक्रिया जरी वेगाने होत असली तरी जास्त पावसाच्या प्रमाणामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाहून जातो. सेंद्रिय कर्ब नदीवाटे खाडीत आणि खाडीतून समुद्रात जाऊन तो माशांना उपलब्ध होतो आणि म्हणूनच समुद्रातील माशांना किंवा वनस्पतींना हा कर्ब मिळून त्यांची वाढ जोमाने होते. पण हा कर्ब शेतकऱ्यांच्या उपयोगाला न आल्यामुळे शेतीचे उत्पादन मात्र कमी राहते.अशा वेळेला एक पर्याय म्हणून हा कर्ब उत्पादनात आणण्यासाठी एक प्रयोग करून बघता येईल* ……


*समजा पावसाळ्यानंतर उपलब्ध झालेला पालापाचोळा आळंबी उत्पादनासाठी वापरल्यास ह्या पालापाचोळा यापासून आळंबी उत्पादन मिळेल तसेच कुजण्याची प्रक्रिया ही वेगाने होईल. आळंबी उत्पादनसाठी कुजण्यास कठीण कचरा (लाकूड , नारळाच्या झावळ्या इ.) इतर कचरा जाळून ह्या उष्णतेचा उपयोग पालापाचोळानिर्जान्तुकीकरण प्रकरण्यासाठी वापरता येईल*.


*अळंबी उत्पादनानंतर अर्धवट कुजलेले पालापाचोळा गांडूळ खत बनवण्यासाठी वापरून असे गांडूळखत किवा गांडूळ पाणी शेतीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मिळवता येईल*.


*पावसाळ्याच्या सुरवातीला मागील वर्षातील गांडूळ पाणी (वर्मिवाश) वापरून वाहून जाणाऱ्या कार्बाची पूर्तता करता येऊ शकते*.


*तसेच मासळी खत , कोंबड खत तसेच स्पुरद आणि पालाश युक्त खते (SSP/ MOP इ.) बायोगॅस मधून बाहेर येणारा काल्याबरोबर (slurry ) मिश्रित करून वापरता येतील*.


*कमी पावसाचा प्रदेश*–

*विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात कोरडवाहू जमिनीतील सेद्रिय कर्ब वाढवणे कठीण असते. ह्याचे मुख्य कारण जमिनीतील कमी ओलावा*


*ओलाव्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करून जमिनीत वापसा टिकवता येईल*.


*हिरवळीची खते जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनीची पाणी धारण क्षमता वाढवण्यास मदत करते*


*जीवामृत, गांडूळ खत ,जिवाणू खतांचा जास्तीत जास्त उपयोग*


*जेथे सिंचनाची सोय आहे आणि ऊस किंवा इतर नगदी पिके जास्त प्रमाणात घेतली जातात अशा ठिकाणी नगदी पिकांबरोबरच आंतरपीक म्हणून पट्टा पद्धतीने हिरवळीच्या खतांचा उपयोग वाढवता येईल*


*बऱ्याचदा असे दिसून येते सेंद्रिय शेती करताना शेतकरी रासायनिक खतांना विष समजून त्यांचा उपयोग अचानक पणे पूर्ण बंद करून टाकतात. खरेतर युरिया ( नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट (स्पुरद), पोट्याश (पलाश), सल्फर आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये जिवाणूंच्या वाढीसाठीही अन्नद्रव्य पुरवतात आणि सुक्ष्मजीवाणूनी वापरून रुपांतरीत झालेली अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देतात. पण आपण गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा अतिरेक किंवा अयोग्य वापर आणि सेद्रिय कर्बाचे कमी होणारे प्रमाण ह्या मुळे जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊन कुजण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जिवाणूंची वाढ न झाल्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचीही उपलब्धता होत नाही. एखादी गोष्ट कुजण्यासाठी नत्राची गरज ही युरियाचा वापर करून पुरवता येऊ शकते. जसे की उसाचे पाचट किंवा गव्हाचा भुसा शेतांमध्ये कुजण्यास वेळ लागतो आणि नंतरचे पिक चांगल्या पद्धतीने येत नसल्यामुळे शेतकरी असा कचरा जाळून टाकतात. खरेतर हा सर्व काडीकचरा जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी खूप उपयोगाचा आहे. हा काडीकचरा योग्य गतीने कुजण्यासाठी युरियाचा वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून सेंद्रिय शेती करण्यास मदतच होते. कालांतराने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून (१.० ते २ % ) इतर वरखते पूर्ण बंद करता येऊ शकतील आणि खर्या अर्थाने सेंद्रिय किवा शाश्वत शेती शक्य होईल*...